Wednesday, 7 August 2013

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश

****विजय लाळे ******

वाई-महाबळेश्वरला जोरदार पाऊस, कराड-पाटणात संततधार, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातली अनेक गावे पाण्याखाली,पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, कोयनेसह धोम, राधानगरी, नीरा देवधर, भाटघर धरणे भरली, सांगली जिल्ह्यात पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला… सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे. मात्र कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा माणदेश प्रांत अद्यापही पुरेशा पावसासाठी तरसला आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्याच्या सीमावर्ती असलेल्या या भागात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या चारा छावण्या अजूनही सुरू आहेत, गावोगावी फिरणारे टँकर्स अद्यापही पिण्याचे पाणी घेऊन धावत आहेत. वळवाच्या आणि जून महिन्याच्या मध्यावर झालेल्या थोडयाफार पावसाने शेतात पेरण्या झाल्या. परंतु त्यानंतर महिनाभर केवळ ढगाळ, तर कधी ढगाळलेल्या वातावरणात पडणाऱ्या पावसाच्या चार-दोन थेंबांवरच पावसाचे चक्र थांबले आहे. ऐन पावसाळयात पडणाऱ्या थोडयाफार पावसाने इथला निसर्ग हिरवाळला आहे हे खरे असले, तरी आता मोठे पाऊस झालेच नाहीत तर? सलग चौथ्या वर्षाचा खरीपही मातीत जाणार की काय? अशा प्रश्नाने माणदेशी माणसाच्या पोटात गोळा येत आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाचा कलंक माथी घेऊन जगणारी इथली माणसे, या भागात जन्माला येणे हे जणू आपले पूर्वजन्मीचे पाप आहे, अशा समजात जगत असलेले इथले लोक आणि हा माणदेशी टापू. असे का झाले? दुष्काळाचे आणि इथल्या माणसांचे नाते तरी काय आहे? कधीपासूनचा आहे हा दुष्काळाचा कलंक?  याचा नेमका आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. . .
”त्येची अशी कथा सांगत्येत मास्तर, का रामायण काळात रामलक्षिमन या भागात देव देव करत फिरत आलं. हितल्या रामघाटावर सावली बघून जेवाय बसलं अन् एकदम पाऊस आला, जोरकस आला. सगळया अन्नात पानी पानी झालं, तवा रामाला आला राग, त्येनं एक बाण मारून पावसाला पार बालेघाटात पिटाळला. तवाधरनं जो ह्या मानदेशात पाऊस नाय, तो आजपातूर. बगा तुमी, पावसाळयात आपल्या टकुऱ्यावरनं काळं काळं ढग जात्यात… जात्यात अन् पडत्यात ते बालेघाटातच.”
व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीतला रामा बनगर, कथानायक असणाऱ्या मास्तरला जणू माणदेशाच्या दुष्काळाचं जणू इंगितच सांगतो.1940च्या दशकातली ही कादंबरी, परंतु यातलं वर्णन आजच्या माणदेशालाही तंतोतंत लागू पडतं. माणदेश हा सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील मधला प्रदेश. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पर्जन्यछायेचा हा भाग. यात सांगली जिल्ह्यातले खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ हे तालुके, सोलापूर जिल्ह्यातले सांगोला आणि मंगळवेढा, तर सातारा जिल्ह्यातले माण-म्हसवड, खटाव या तालुक्यांचा समावेश होतो.
कृष्णेसारखी सर्वात मोठी नदी केवळ 80 मैलावर असताना हा भाग पाण्यापासून हजारो, लाखो वर्षांपासून वंचित आहे. पाण्याला मराठीत ‘जीवन’ असा प्रतिशब्द आहे, तो माणदेशी जगणे भोगणाऱ्याला सर्वार्थाने सहज समजतो. या भागात पाऊस कमी, ओढे, नाले नद्यांचे प्रमाणही कमी. या भागात माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तीनच मोठया नद्या आहेत. माणगंगा ही सर्वात मोठी नदी 180 किलोमीटर लांबीची. येरळा 60 किलोमीटर, तर अग्रणी 40-45 किलोमीटर लांबीची. या भागातले गेल्या 100 वर्षातले वार्षिक सरासरी पाऊसमान जरी पाहिले तरी 550 ते 600 मिलिमीटरपेक्षा ते कधीच जास्त नव्हते आणि नाही. त्यामुळे पावसाचे पाणी अडवणे आणि जिरवणे यापेक्षा जिथे पाणी आहे, त्या भागातून पाणी आणणे हा एकमेव उपाय उपलब्ध आहे.
माणदेशाच्या दुष्काळाच्या इतिहासाचा धांडोळा घ्यायचे ठरवले तर तो पार रामायण-महाभारतकाळापर्यंत घेता येईल. मात्र दुष्काळाच्या ज्ञात आणि नोंदीत असलेला इतिहास इ.स. 941पासून सुरू होतो. सलग आठ वर्षे हा दुष्काळ पडला होता. सबंध भारतवर्षात प्रसिध्द पावलेला, त्यानंतरचा 1396 ते 1407 या काळातला दुर्गादेवाचा दुष्काळ. माणदेशातल्या सर्व प्रांतांसह, गुराढोरांनाही त्या दुष्काळाची प्रचंड मोठी झळ बसली. त्यानंतर 1458 ते 1460 या काळात परत दुष्काळ पडला. या वेळी माणदेशातील मंगळवेढा प्रांतात झालेल्या एका घटनेची नोंद इतिहासात आहे. दामाजीपंत नावाचे विठ्ठलभक्त संत बिदरच्या बादशहाच्या पदरी अंमलदार म्हणून नोकरीत होते. मंगळवेढे त्या वेळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जात होते. त्या वेळी गोदामात प्रचंड धान्य होते. दुष्काळात अन्न-अन्न करून मरणाऱ्या गोरगरिबांची दशा दामाजीपंतांना पाहवली नाही. त्यांनी बादशहाच्या परोक्ष धान्याची कोठारे गोरगरिबांना खुली केली.
पुढे 1791 ते 1792 या काळात पुन्हा दुष्काळ पडला. ‘कवटी दुष्काळ’ या नावाने हा दुष्काळ ओळखला गेला. याच दुष्काळातून बेरोजगार लोकांना आणि शेतमजुरांना दुष्काळी कामे देऊन मोबदल्यात धान्य अगर गरजेच्या वस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. 1876 ते 1878 या त्यानंतरच्या काळातल्या दुष्काळात माणदेशात पहिल्यांदा जनावरांच्या छावण्या सुरू करण्यात आल्या. पिंगळी, नेर, म्हसवड, तसेच सांगोला भागात शेकडो जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. या काळात गोंदवले येथे गोंदवलेकर महाराजांनी माणसांसाठी अन्नछत्र आणि जनावरांसाठी वैरण छावणी सुरू केली.
त्याच काळात ब्रिटिश अमदानीत राणी व्हिक्टोरियाने पिंगळी नदीवर पिंगळी तलाव आणि माणगंगा नदीपात्रात राजेवाडी तलाव (यालाच म्हसवड तलाव असे शासन दप्तरी नाव आहे) दुष्काळी कामातून बांधला, ज्याद्वारे लोकांच्या हाताला काम मिळाले, रोजगार मिळाला. त्यानंतर 1937मध्ये आटपाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केवळ दुष्काळ आहे आणि तरीसुध्दा तत्कालीन इतर राज्यपध्दतीनुसार या भागात दुप्पट-तिप्पट शेतसारा आकारला जातो, म्हणून औंध सरकारविरुध्द मोर्चा काढला होता. त्या वेळी चार हजार शेतकऱ्यांनी आटपाडी ते औंध हे जवळपास 90 किलोमीटरचे अंतर पायी चालत लाँग मार्च केला. पुढच्या काळातील राजकारणावर याच मोर्चाचा परिणाम झाला. 1937 साली औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी वयाच्या 73व्या वर्षी मागणे मान्य झाल्याचे सांगत इथून पुढे प्रजा परिषदेच्या रूपाने जनताच संस्थानचा सारा कारभार चालवेल, अशी घोषणा केली. त्यामुळे आटपाडीकरांना प्रत्यक्ष भारत स्वतंत्र होण्यापूर्वी दहा वर्षे आधीच स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यानंतरच्या काळातही दुष्काळाने माणदेशाची पाठ सोडल्याचे दिसत नाही. 1960-62 या काळात एकीकडे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होत होते, त्या वेळीही माणदेशातले लोक पाण्यासाठी टाहो फोडत होते.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही पश्चिम महाराष्ट्रात वसंतरावदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, अगदी पार शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत कर्तबगार राजकारण्यांची एकेक पिढी पुढे सरकत आहे. परंतु सुजलाम् सुफलाम् समजल्या जाणाऱ्या याच पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील हा माणदेश टापू अश्वत्थाम्याप्रमाणे हजारो वर्षांची दुष्काळाची आपली भळभळती जखम भाळी घेऊन आला दिवस ढकलत आहे.
पुढे 1972च्या दुष्काळात या भागात प्यायला पाणी होते, परंतु खायला अन्न नव्हते. टेंभ्याच्या दिव्यावर हळकुंड भाजून खायचे. हुलग्याचे माडगे खाऊन इथल्या लोकांनी बराच काळ व्यतित केल्याचे इथले वृध्द सांगतात. एकदा पंतप्रधान पंडित नेहरू दुष्काळ पाहण्यासाठी म्हसवडला आले असता, ”आम्हाला भाकरी मिळत नाही, माडगे खाऊन जगावे लागते” असे इथल्या लोकांनी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी ”मलासुध्दा माडगे द्या” अशी मागणी केली. तेव्हा सरकारी बाबूंनी नेहरूंना माडगे दिले. पण इथले लोक जसे नुसते मीठ घातलेले माडगे खात होते, तसे न देता गूळ, तूप, वेलदोडा आणि सुका मेवा घातलेले माडगे दिले. त्यावर, ”अरे, असे इतके पौष्टिक पदार्थ तर आम्हालाही मिळत नाहीत अणि तुम्ही दररोज खाता” असे म्हणत नेहरूंनी इथल्या जनतेचे कौतुकच केले. परिणामी दुष्काळाचे गांभीर्यच निघून गेले आणि वास्तव समोर आलेच नाही, असे इथले जुने जाणकार लोक आजही सांगतात.
त्यानंतर 1983-84मध्ये दुष्काळ पडला. त्या वेळी आटपाडीत बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी परिषद झाली होती. त्यात भीमेचे पाणी आटपाडीला देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर 1992-93च्या दुष्काळात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे आटपाडीत आले असता त्यांना काही पत्रकारांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीव जागृती विचार मंचाच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यानंतरच आटपाडीसह तेरा दुष्काळी तालुक्यांची पाणी संघर्ष चळवळ सुरू झाली. एकेक तालुके वाढत गेले. चळवळ व्यापक बनली. आता या वर्षी या चळवळीला दोन दशके पूर्ण होतील. माणदेशातल्या दुष्काळी भागाला टेंभू, जिहे-काठापूर, उरमोडी या आणि अन्य योजनांचे पाणी मिळावे, यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णांचे उभे आयुष्य खर्ची पडले. परंतु या योजनांचे पाणी काही आले नाही. शासन पातळीवरही अनेक घोषणा होतात. अनेक जण या भागाला वेगवेगळया योजनांचे पाणी मिळवून देण्याचे प्रयत्न करतात. पुढे 2003-04च्या दुष्काळात राज्यपाल महम्मद फजल आणि जॉर्ज फर्नांडिस यांनीही आटपाडीच्या दुष्काळाची पाहणी केली. पण माणदेशासह आटपाडीकरांच्या नशिबात पाणी काही आलेले नाही.
माणदेशाचा संपूर्ण इतिहास दुष्काळाच्या पानांनीच भरलेला आहे आणि म्हणूनच व्यंकटेशतात्यांच्या बनगरवाडीतल्या सगळया घटना केवळ काल्पनिक म्हणताच येणार नाहीत. हजारो वर्षांपासून आपला भाग सोडून आपण आणि आपल्या मेंढया घेऊन पावसाच्या प्रदेशात वर्षातले आठ-आठ महिने जगायला जाणारे माणदेशी मेंढपाळ काय, किंवा मुंबईत गोदी कामगार म्हणून किंवा वसई भागात गवंडयाच्या हाताखाली पडेल ते काम करण्यासाठी पोटापाण्यानिमित्त जाणारे लोक काय, किंवा नोकरी-धंद्यासाठी आपला मुलूख सोडून शहरात जाऊन स्थायिक झालेले मूळचे माणदेशवासीय काय, हे केवळ माणदेशातल्या दुष्काळाचेच एक प्रकारचे बळी नाहीत का? शिवाय दुष्काळ हेच देशभरात विखुरलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या स्थलांतरामागचे एकमेव कारण आहे, हे कसे विसरून चालेल?
 8805008957