Tuesday, 27 August 2024

व्यंकटेश माडगूळकरांचे आकाशवाणीसाठीचे योगदान

 व्यंकटेश माडगूळकर यांचा आज २२ वा पहिला स्मृतिदिन. मी त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त २८ ऑगस्ट २००२ रोजी दैनिक सामना, मध्ये असताना लिहिलेला लेख.

 व्यंकटेश माडगूळकरांचे आकाशवाणीसाठीचे योगदान



"माडगूळकर, तुम्ही माझ्या शेजारी बसा. तुम्ही स्पर्श माझं भाषण सुरू करतो आणि भाषणाची वेळ संपायला येण्यापूर्वी १५-२० सेकंद आधी मला दुसरा स्पर्श करा, मी योग्य वेळेत थांबेन!" आकाशवाणीच्या पुणे केंद्रात शेती विभागात काम करणाऱ्या साहित्यिक व्यंकटेश माडगूळ करांना श्री.म.माटे (मास्तर) म्हणाले. माटे मास्तरांची दृष्टी वयोमानानुसार अजिबात काम द्यायची बंद झाली होती. त्यावेळची ही गोष्ट. माडगूळकरांनी आकाशवाणी पुणेच्या शेती विभागात काम करीत असताना केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांतील 'महाराष्ट्रातील जलवाहिन्या' या भाषण मालिकेच्या प्रयोगात माटे मास्तरांना पाचारण केलं होतं. माटे मास्तर आपल्या लिखित भाषणाची प्रत हाती घेऊन केंद्रावर आले, तात्यांनी ती प्रत डोळ्याखालून घातली. भाषणाच्या ध्वनिक्षेपणाची वेळ झाली तेव्हा मी मातरांना हाताला धरून स्टुडिओत नेलं, खुचींवर माईकसमोर बसवलं, पण तात्यां च्या मनात भीती, मास्तर अंध असताना भाषण वाचणार कसे? भाषण सुरू करायची अन् संपवायची वेळ त्यांना समजणार कशी? त्यावर माटे मास्तरांनीच उपाय काढला, पण आमच्या सर्वांच्या मनातून ध्वनिक्षेपणाबाबतची शंका काही केल्या जाईना. अखेर लाल दिवा लागला, व्यंकटेश माडगूळकरांना सर्वजण तात्या म्हणत. तर तात्यांनी तत्परतेनं मास्तरांच्या खांद्याला स्पर्श केला, तसं मास्तरांनी सुरुवात केली 'हे नर्मदामाते..." सलग १४ मिनिटे अस्खलित, शुद्ध, स्वच्छ, स्पष्ट आवाजात त्यांनी भाषण केलं. क्षणभरही विचलित न होता ते बोलत होते, शेवटी बरोबर १५ सेकंद कमी असताना मी तात्यांना खूण केली, त्यांनी पुन्हा मास्तरांना स्पर्श केला आणि... आणि माटे मास्तरांनी 'हे नर्मदा माते तुला माझे वंदन असो।" असं शेवटचं वाक्य उच्चारून भाषण संपवलं, लाल दिवा मालवला गेला आणि तात्यांनी दीर्घ निःश्वास सोडून मास्तरांचे हात आपल्या हाती घेत भाषण अप्रतिम झाल्याचे सांगितलं. तात्यां च्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. मास्तरांबद्दल च्या श्रद्धेचा, आदराचा भाव त्या डोळ्यांत उतरला होता, या आणि अशा तात्यांच्या जीवनातल्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या आटपाडी (जि. सांगली)तले आकाशवाणी कलाकार, माडगूळकरांचे पुणे आकाशवाणीवरचे सहकारी, जीवाभावाचे मित्र कृष्णराव कल्याणराव सपाटे (काका) यांनी सांगितलेली ही एक आठवण.

व्यंकटेश माडगूळकरांचं साहित्य क्षेत्रातलं स्थान अढळ आहेच, परंतु आकाशवाणी या सरकारी माध्यमाला जनमानसात नेऊन त्याबद्दल आपुलकी निर्माण करण्याचं मोलाचं कार्यही तात्यांनी तळमळीने, निष्ठेने केलं. २८ ऑगस्ट २००२, व्यंकटेश माडगूळकर यांचा प्रथम पुण्यतिथी दिन. त्यांच्या अमृत महोत्सवी जयंती दिनापासून म्हणजे ६ जुलै २००२ पासून आटपाडी (जि. सांगली) येथे सुरू असलेल्या व्यंकटेश माडगूळकर कथाकथन महोत्सवाची सांगता २८ ऑगस्टला होत आहे. व्यंकटेश तात्यांच्या आठवणीनी संपूर्ण माणदेश, इथली माणमाती भिजून चिंब होत आहे. सपाटेकाका गेल्या १८ मार्चला इहलोक सोडून गेले, पण जाण्यापूर्वीच सपाटेकाकांनी व्यंकटेश माडगूळ कर नावाच्या माणदेशी हिऱ्याने आपल्या कार्यकर्तृत्वाने आकाशवाणीलाही फार मोठे योगदान दिले, त्याबद्दल खूप काही सांगितले.

१९५३ मध्ये २ ऑक्टोबरला पुणे आकाशवाणी केंद्राचं उद्‌घाटन झालं, त्यावेळी केंद्र पुणे स्टेशनजवळच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये होतं. त्यावेळचे केंद्राचे सहसंचालक एन. एल. बावला यांनी 'शेतकरी मंडळ' म्हणजे ग्रामीण शेतकरी लोकांसाठीचा विभाग, या विभागा साठी व्यंकटेशतात्यांना सन्मानानं पुणे आकाश वाणीवर रुजू करून घेतलं आणि तिथूनच या शेतकरी मंडळाच्या कार्यक्रमाचे रूप, चेहरा मोहरा बदलला. तात्यांबरोबर साहित्यिक द. मा. मिरासदार मदतनीस म्हणून केंद्रावर आले. त्यावेळी वेगवेगळ्या आकर्षक कल्पना साकार होत गेल्या. तात्यांनी सपाटेना आपल्या शेती विभागात मागवून घेतले. बहुजन हिताय बहुजन मुखाय' या आकाशवाणीच्या ब्रीदानुसार सर्वसामान्यांना रुचेल, पटेल अशी कार्यक्रमांची आखणी केली गेली. त्यातूनच पुढे 'मनोरंजना तून लोकशिक्षण' ही संकल्पना तात्यांनी पुढे आणली. त्या काळातल्या तरुण नवोदित लेखकांना आवाहन करून विशेषतः ग्रामीण भागासाठी अनेक कार्यक्रम तयार केले,

एकदा होळीच्या सणानिमित्त तात्यांनी 'बिनबियांचं झाड' हे लोकनाट्य लिहिलं, ते पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील गोखले हॉलमधून सरळच ध्वनिक्षेपित करून सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं. यात नागेश जोशी, स्वतः कृष्णराव सपाटे, इंदिराबाई चिटणीस आणि कॉग्रेस सेवा दलातील मुलगी पद्मा कोकनूरकर यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम ग्रामीण श्रोत्यांसह पुणेकरांनाही खूप आवडला.

'शेतकरी मंडळ' कार्यक्रमाची तात्यांनी नव्याने मांडणी करून त्याचे नाव 'गावकरी फड' असं ठेवलं, या ग्रामीण ढंगातील 'गावकरी फड़ा'चा रंग पुढे महाराष्ट्र‌भर उधळला गेला. या कार्यक्र मात संवाद मनोरंजन, गप्पागोष्टी सुरू केल्या. तात्यांनी निर्जीव वस्तूंवर सजीवाची कल्पना चढवून तयार केलेले संवादही फार गाजले. उदा. बाजरीवरील संवाद, मी टोमॅटो बोलतोय 

वगैरे. अशा नव्या रूपातला 'गावकरी फड' शेतकरीवर्गानं अक्षरशः डोक्यावर घेतला. पुढे याच कार्यक्रमात नानासाहेब चापेकर म्हणजे कै. केशवराव भोसले यांच्या 'ललित कलादर्श' या नाट्य संस्थेचे भागीदार नानासाहेब चापेकर आणि सपाटेकाका यांना तात्यांनी 'गणपा आणि आबा' ही संवादरूपी कार्यक्रम मालिका लिहून दिली, तीही प्रचंड गाजली. खेड्यातल्या लोकांच्या वाईट सवयी, बालीरीती, रूढी परंपरा, अंधश्रद्धा यांवर हळुवार टीका करीत प्रबोधनाचा असा हा कार्यक्रम सर्वांनाच आवडला. पुढे हिंदुस्थान सरकारचा 'घर आणि शेती शाळेचा पाठ' हा कार्यक्रम तात्यांनी प्रयोग म्हणून पुणे केंद्रावर संपूर्ण देशात पहिल्यांदा सुरू केला. हा कार्यक्रम तात्यांनी एक आव्हान म्हणून स्वीकारला. एकूण २० कार्यक्रम अर्ध्या अर्ध्या तासाचे थेट ध्वनिक्षेपित करायचे आणि ग्रामीण श्रोत्यांवर किती आणि कसकसा परिणाम होतो याची टिपणं काढायची. ही टिपणं सरकारला सादर करायची असे एकूणच त्याचे स्वरूप होते. या कार्यक्रमासाठी तात्यांनी पु. ल. देशपांडे (जे त्यावेळी मुंबई आकाश वाणीवर नोकरीत होते) त्यांना खास मुंबईहून पुण्याला बोलावून घेतले. राज्यभरात या कार्य क्रमाच्या अनुषंगाने २०० नभोवाणी शेतकरी मंडळं ठिकठिकाणी निर्माण करण्यात आली. त्यात एक अध्यक्ष, एक चिटणीस आणि १०- १२ सभासद असत. त्यांनीच आकाशवाणीचा 'घर आणि शेतीशाळेचा पाठ'चा प्रत्येक कार्यक्रम ऐकायचा, त्यावर टिपणं काढायची आणि त्यांवरील प्रश्न व अभिप्राय पुणे केंद्रावर पाठवायचा, ही योजना पश्चिम महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवली. त्यानंतर देशात ही योजना सर्वच आकाशवाणी केंद्रांनी राबवली. त्याचंच फळ म्हणून तात्यांना आकाशवाणीच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हिंदुस्थान सरकारने स्वखर्चाने ऑस्ट्रेलियाला पाठविले. त्यातूनच 'माडगूळे ते मेलबोर्न' आणि 'पांढरी मेंढरे हिरवी कुरणे' ही दोन प्रवासवर्णने त्यांनी लिहिली. तात्यांनी आकाशवाणीच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमातही विविधता आणली. पूर्वी मुंबई केंद्रावर पोवाडे, कोळी गीतं आणि लावण्या एवढेच लोकसंगीताचे प्रकार म्हणून कार्यक्रम ऐकवीत असत. परंतु तात्यांनी यांत एकतारी भजनं, संगीत भजनं, भारूड, गोंधळगीतं, खंडोबाची गाणी, देवीची गाणी, पोतराजाची गाणी, धनगरी ओव्या, भेदिक गीतं, लमाणी, डवरी गीतं, नाथांची गीतं, वासुदेवाची गीतं आदि लोकसंगीताने हा विभाग नटवला. अगदी तळागाळातल्या लोकसंगीताला सुद्धा तात्यांनी आकाशवाणीसारखं सशक्त व्यासपीठ निर्माण करून गावपातळीवरच्या उपेक्षित कलाकाराला देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली. यानिमित्ताने अस्सल माणदेशी जीवनाचा भाष्यकार, लेखक साहित्यिक असलेल्या व्यंकटेश माडगूळकरांनी आकाशवाणीसाठीही योगदान दिलं होतं, हे विसरून चालणार नाही.

                                   - विजय भास्कर लाळे

No comments:

Post a Comment